निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणूक प्रक्रियेचा सखोल आढावा ; बल्लारपूर विधानसभा क्षेत्र
भारत निवडणूक आयोगाने ७२ बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक मा. संगीता सिंग (IAS) आणि मा. खर्च निरीक्षक मा. आदित्य बी IRS यांनी आज मुल येथील प्रशासकीय भवनात निवडणूक प्रक्रियेचा सखोल आढावा घेतला.
यावेळी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सर्व मतदारांना संधी मिळावी, विशेषत: ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले वृद्ध आणि दिव्यांग असलेल्या मतदारांसाठी ७२ बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात दि ०९ नोव्हेंबर २०२४ ते ११ नोव्हेंबर २०२४ घरून मतदान (होम व्होटिंग) करता येईल त्यानुषंगाणे चर्चा करण्यात आली. मा. संगीता सिंग यांनी संबंधित Mirco-Observers यांची बैठक घेऊन विशेष मार्गदर्शन केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी देखील उपस्थित होते.
याशिवाय, मा. खर्च निरीक्षक मा. आदित्य बी यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान होणाऱ्या खर्चाचे काटेकोर निरीक्षण करण्यासाठी उपाययोजना आखल्या. त्यांनी प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाच्या तपशीलवार नोंदींची प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे पडताळणी केली. यासाठी खर्चाच्या अहवालांची बारकाईने तपासणी करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य खर्च होणार नाही याची खात्री करता येईल. उमेदवारांनी नोंदविलेल्या खर्चाच्या अहवालातील बाबी आणि प्रत्यक्ष खर्च यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित उमेदवारांना योग्य त्या सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूर जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी आणि निवडणूक प्रक्रिया प्रमुख श्री. विनय गौडा यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी मा. श्री अजय चरडे, सर्व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची सखोल बैठक दुपारी ४.०० वाजता घेतली. या बैठकीत त्यांनी आचारसंहिता अंमलबजावणीची गंभीरता, मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी करण्यात येणाऱ्या विशेष उपाययोजना, मतदान केंद्रावर पुरविण्यात येणाऱ्या सुविधा तसेच मतदान कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आणि प्रशिक्षणावर भर देण्याच्या सूचना दिल्या. तसेच, मतदान केंद्रांवर शिस्तबद्धता राखण्यासाठी आणि प्रत्येक केंद्रावर आवश्यक त्या संसाधनांची पूर्तता करण्यासाठी कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि नियोजनावर भर दिला.
मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढावा, शांतता आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात दक्षता आणि संयमाने काम करण्याचे निर्देश मा. जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिले.
0 Comments