Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा पाच गावच्या सरपंचांची मागणी,अन्यथा आंदोलनाचा इशारा

नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा
पाच गावच्या सरपंचांची  मागणी,अन्यथा आंदोलनाचा इशारा

मूल (अमित राऊत)

मरेगाव, आकापूर, चिमढा, चितेगाव,टेकाडी या परिसरात धुमाकूळ घालणा-या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी या पाच गावच्या सरपंचांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप कारमवार यांच्या नेतृत्वात विभागीय वन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.नुकतेच मरेगाव येथिल शेतकरी वासूदेव पेंदाम याला चितेगावच्या नाल्याजवळ वाघाने हल्ला करून ठार  केले होते. याआधी उन्हाळयात मरेगाव येथे गावातील शेतक-यांच्या जनावरांवर हल्ला करून गायी आणि म्हशींना मारले होते. मागिल अनेक दिवसांपासून नरभक्षक वाघ या  पाचही गावांमध्ये धुमाकूळ घालीत आहे. त्यामुळे चितेगाव, मरेगाव चिमढा,टेकाडी आणि आकापूर या वनव्याप्त परिसरातील शेतक-यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.शेतकरी शेतमजूर आणि गुराख्यांच्या जनजीवनावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. वाघाच्या आणि इतर वन्यप्राण्यांच्या भितीमुळे शेतीची कामे खोळंबली जात आहे. शेती आणि वन परिसर लागूनच असल्याने शेतक-यांना आपला जीव मुठीत घेवून धानाच्या शेतीत लक्ष घालावे लागते. वाघाच्या भीतीमुळे शेतमजूर धास्तावल्याने शेतीच्या कामासाठी महिला आणि पुरुष मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी वर्गांनी आणि शेतमजुरांनी जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचत आहे, त्यामुळे येथील धनाची आणि इतर पिकांची शेती धोक्यात आली आहे. 

तसेच जनावरांच्या चरायचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील शेतकरी शेतमजूर आणि गुराख्यांचा विचार करून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा आणि त्यांना न्याय द्यावा अशी मागणी सरपंचांनी केली आहे. अन्यथा वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. सावली वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या मार्फतीने प्रादेशिकचे विभागीय वन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सिस्टमंडळामध्ये बाजार समितीचे संचालक संदीप कारमवार, आकापूरचे सरपंच भास्कर हजारे, चितेगावचे सरपंच कोमल रंदये, मरेगावचे सरपंच जोशना पेंदोर, चिमढ्याचे सरपंच कालिदास खोब्रागडे, टेकडीचे  सरपंच सतीश चौधरी आदी उपस्थित होते. पाचही गावच्या सरपंचांनी आपापल्या ग्रामपंचायतच्या मार्फतीने मानधिकार्‍यांना निवेदन दिले.

Post a Comment

0 Comments