Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पीएम घरकुल लाभार्थांना तातडीने निधि वाटप करा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,अन्यथा आंदोलनाचा इशारा

पीएम घरकुल लाभार्थांना तातडीने निधि वाटप करा
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,अन्यथा आंदोलनाचा इशारा

चंद्रपूर प्रतिनिधी

केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रत्येक गरिबांना पक्के घर देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन चंद्रपूर शहरात पांढरा हत्ती ठरत आहे. येथे अनेक वर्षांपासून अत्यंत गरीब कुटुंबातील लोक घरासाठी भटकत आहेत, मात्र आजतागायत त्यांना कायमस्वरूपी घर मिळालेले नाही. महापालिकेने गेल्या पाच वर्षांत केवळ 407 जणांना घरे मंजूर केली आहेत. तर अनेक लाभार्थी त्यांच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे शहरातील विठ्ठल मंदिर वार्ड व इतर लाभार्थ्यांना तातडीने घरकुल निधी मंजूर करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदना द्वारे केले. गरिबांना स्वतःची घरे मिळावीत या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केल्याचे सांगण्यात आले. ही योजना शहरी आणि ग्रामीण अशा दोन विभागांमध्ये चालवली जात आहे. महापालिका क्षेत्रात अनेक लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. मात्र अद्यापही अनेक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. राज्य शासनाकडून मिळालेला निधी महापालिकेने केवळ 407 लाभार्थ्यांना वितरित केला आहे. तर केंद्र सरकारकडून मिळालेले अनुदान देण्यात आले नाही. महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेचे हजारो लाभार्थी आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 407 जणांना निम्मे अनुदान मिळाले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापालिका कार्यालयात ते भेटी देत आहेत, मात्र अधिकारी त्यांना कोणतेही ठोस उत्तर देत नाहीत. काही लाभार्थ्यांच्या निवासस्थानाचे काम सुरू आहे. अनेक लाभार्थ्यांची कामे अपूर्ण आहेत. ते हप्त्याच्या चेकची वाट पाहत आहेत. मात्र, महापालिकेने दरवर्षी एक हजार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेने गेल्या पाच वर्षांत केवळ ४०७ लाभार्थ्यांना घरे मंजूर केली. केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, केंद्र सरकारशी केवळ पत्रव्यवहार केला आहे, गेल्या अनेक वर्षांपासून तेच उत्तर दिले जात आहे. मात्र प्रत्यक्षात कारवाईचा काय परिणाम झाला हे ते आजतागायत सांगत नाहीत. प्रशासनाच्या या कारभारामुळे व दुर्लक्षामुळे आज शहरातील अनेक लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेपासून वंचित आहेत. या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ त्वरित द्यावा. अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला. यावेळी शुभम ठाकरे, वसंता पवार, नयन डोईफोडे, आशिष खडसे, अखिलेश राऊत, प्रतिभा खडसे, आशा बावणे, किरण गेडाम, आशा झाडे व अन्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments