Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

धनंजय पोटे लिखित बेवारस कादंबरीचे प्रकाशन

धनंजय पोटे लिखित बेवारस कादंबरीचे प्रकाशन

मूल (प्रतिनिधी)
    
पोंभुर्णा तालुक्यातील चेक कोसंबी येथील कवी धनंजय पोटे यांच्या "बेवारस" या कादंबरीचे प्रकाशन  पंचायत समिती येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात  येथे संपन्न झाले तसेच   निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडले.

झाडीबोली साहित्य मंडळ, चंद्रपूर जिल्हा शाखेद्वारा आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते  तर उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे  माजी सिनेट सदस्य सुनील शेरकी लाभले होते.  प्रमुख भाष्यकार म्हणून झाडीबोलीचे जिल्हा प्रमुख कवी अरुण झगडकर , जिल्हा महिलाध्यक्ष  प्राचार्य रत्नमाला भोयर मुल, कवी गंगाधर कुनघाडकर , शिक्षण विस्तार अधिकारी बाबुराव मडावी , कथाकार आनंदराव बावणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रास्ताविक धनंजय पोटे यांनी करून कादंबरी लेखनामागील प्रेरणा यासंबंधाने प्रकाश टाकला. यावेळी उद्घाटक सुनिल शेरकी म्हणाले, साहित्यातून लेखक व्यक्त होत असतो. त्यांना आलेले जीवनानुभव तो लेखनशैलीतून  मांडत वाचकांचे जणूकाही प्रबोधन करीत असतो. झाडीबोली साहित्याचा गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. भाष्यकार अरूण झगडकर म्हणाले की, बेवारस कादंबरी म्हणजे ग्रामीण भागातील व्यक्ती, वृत्तीचे आणि स्वभावाचे वस्तूनिष्ठ अवलोकन आहे. सध्याचे आपले बदललेले गाव यांचेही दर्शन घडते. 

बंडोपंत बोढेकर म्हणाले की, घराघरात शब्दशक्ती जागृत व्हायला हवी. ग्रामजीवनाच्या  जाणिवेला दिशा मिळण्यासाठी साहित्याची विचारपीठं गावोगावी उभी राहिली पाहिजेत. बेवारस कादंबरी ही सामाजिक विषयावर असून गावातील समकालीन स्थितीचे दर्शन घडविते. संघर्षरत असलेल्या निराधार लोकांचे प्रतिनिधित्व करते. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन कवी लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील पोटे यांनी केले. 

दुसऱ्या सत्रात आयोजित कवी संमेलनाचे अध्यक्षस्थानी कवयित्री मंजुषा दरवरे  होत्या. त्यांच्या अध्यक्षतेत निमंत्रित कवीचे कवी संमेलन घेण्यात आले. कवयित्री संगिता बांबोळे गोंडपिपरी,सौ.शशीकला गावतुरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती .या   कवी संमेलनात योगेश धोडरे , संतोष मेश्राम, वृंदा पगडपल्लीवार,सुरेश गेडाम,प्रशांत भंडारे , सरिता गव्हारे , छाया टिकले ,सुजीत हुलके, सविता मालेकर,अर्जुमन शेख,प्रीती जगझाप,डाॕ.अर्चना पोटे,सुजित मोहुर्ले मंदाकिनी चरडे, सुधाकर बामणे आदींनी आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले.सूत्रसंचालन  सुनील बावणे यांनी केले तर आभार मनिषा मडावी यांनी मानले . कार्यक्रमास गोंडपिपरी ,पोंभुर्णा भागातील साहित्यप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments