Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

भेजगाव येथील प्राचीन शिवमंदिरातील ती मूर्ती अग्नीदेवाचीच : अरुण झगडकर

भेजगाव येथील प्राचीन शिवमंदिरातील ती मूर्ती अग्नीदेवाचीच :  अरुण झगडकर

मूल प्रतिनिधी

भेजगाव हे चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात असून जिल्ह्याच्या ठिकाणापासून ४८ किलोमीटर पूर्वेस आणि तालुक्‍याच्या ठिकाणापासून आठ किलोमीटर दक्षिणेत आहे. सदर मंदिराच्या उत्तरेस हेमाडपंथी महादेवाचे मंदिर म्हणून जिल्हा गॕझेटीयर मध्ये तसेच कर्झीसने उल्लेख केलेला आहे. गर्भगृहात देवतेची मूर्ती स्थापित प्रतिमा आज तिथे दिसत नाही. त्यामुळे कुठल्या देवतेचे मंदिर असावे यासंबंधी निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु तिथे अलीकडेच अन्य ठिकाणावरून आणलेली एक विष्णूची मूर्ती ठेवली आहे. असे स्थानिकाकडून कळते. हे मंदिर स्थानिक गाव तलावाच्या पारीवर बांधलेले आहे. 
     मंदिर गर्भगृह अंतराल व मंडप या त्रिअंगी स्थापत्य रचनेतील असून मंडप पूर्णपणे नष्ट झालेले आहे. सध्या मंदिराचे गर्भगृह आणि अंतराल असून ते पूर्व-पश्चिम पाच मीटर आणि उत्तर दक्षिन चार मीटर असून ते पूर्वाभिमुख आहे.
   गर्भगृह चतुरस्त्र आकाराचे असून तेथे यापूर्वीच उल्लेख केल्याप्रमाणे मूळ स्थापित केलेली देवतेची मूर्ती नाही. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वार शाखा भौगोलिक नक्षिणे अलंकृत आहे. तसेच प्रवेशद्वाराचा ललाटावर मंदिराच्या लहान लहान प्रतिकृती कोरल्या आहेत. अंतराल आणि गर्भगृहातील स्तंभ भौगोलिक नक्षीने अलंकृत आहेत.
   मंदिराचे शिखर नागर शैलीचे असून त्यात शुकनासाची रचना होती. परंतु हल्ली त्याचा वरचा भाग खंडित झाला आहे. मंदिराच्या उत्तर दक्षिण आणि पश्चिमेकडील जंघा भागावर लहान लहान आकारातील शिल्पे कोरली आहेत. त्यात नागपुरूष, पुत्रवल्लभा, विविध प्रकारातील मिथुन शिल्पे ,शिव, इंद्र, नरसिंह इतर देवतांची शिल्पे, युद्धस्वार, हत्तीस्वार योद्धे आणि काही प्राण्यांची व नृत्यांगना, अप्सरांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिर वालुका पाषाणात बांधलेले आहे. या मंदिराचा हेमाडपंथी शैलीचे मंदिर म्हणून या पूर्वीच्या विद्वानांनी उल्लेख केलेला आहे. परंतु या मंदिराचे स्थापत्य रचना लक्षात घेता हे मंदिर भूमिज शैलीतील मालव नरेश परमार यांच्या काळातील असावे. तसेच अन्य मंदिराच्या स्थापत्याची तुलना करता या मंदिराचा निर्मितीचा काळ इ.स. ११-१२ वे शतक असा निश्चित करता येतो.
      राजपुतांच्या अग्निकुलापैकी परमार हे एक राजवंश होय.परमार राजवंशात अग्नीदेवतेला कुलदैवत मानत.अग्नी ही हिंदू धर्मातील अग्नीची देवता आहे .वैदिक काळापासून सर्वोच्च देवतांपैकी एक आहे. सुप्रसिद्ध धारानृपती भोज यांचा पुतण्या उदयादित्य यांचा मुलगा जगद्देव यांनी या भागाचे राज्य केले. जगद्देव हा या प्रदेशाचा स्वतंत्र शासक होता. या प्रदेशातील परमारांच्या संपर्कामुळेच मध्यप्रदेशातील स्थापत्य शिल्पकलेचा प्रवेश येते झाला. गडचांदूर, भेजगाव, जूनासुर्ला आणि घंटाचौकी येथील नागर शैलीतील भूमीज प्रकारातील मंदिर स्थापत्यावरून सांगता येते. पाषाणातील बांधकाम असलेली मंदीरे या भागात आढळून येतात. ही मंदिरे राजा जगद्देव यांच्या इ.स.११-१२ वे शतकातच निर्माण करण्यात आली. नुकतेच या मंदिराशेजारी तलावाचे खोलीकरण करताना खोदकामात एक मूर्ती सापडली . तिचे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली . मूर्तीतील देवता मेंढ्यावर स्वार असून तिच्या उजव्या हातात असलेले साधन गदा नसून  स्त्रुक (एका पळीसारखे यज्ञीय पात्र ) जे अग्नी प्रज्वलित करायला तूप वगैरे टाकायचे साधन असून डाव्या हातात यज्ञात टाकावयाच्या तूप वगैरे भरलेले कलश दिसून आले . 
        हिंदू संहितेनुसार मेंढ्यावर स्वार देवता अग्नी असून . यज्ञाची देवता मानली जाते , जी परमार घराण्याची कुलदेवता आहे . पूर्व विदर्भात परमार घराणे अनेक काळ राज्य केल्याचे इतिहासातही अनेक पुरावे आहेत . प्रत्यक्ष भेटीत गावातील प्रतिष्ठित नागरिक विकास गांगरेड्डीवार , जुनासुर्ला येथील लक्ष्मण खोब्रागडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते . 
         

Post a Comment

0 Comments